
बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना कोरोना नियम धाब्यावर बसवून हा विवाह सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळत आहे.

अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग कुठेच पाहायला मिळालं नाही. इतकंच नाही तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते!

आमदार राजेंद्र राऊत यांच्या रणजित आणि रणवीर या दोन मुलांच्या लग्नात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या नेतेमंडळीच्या चेहऱ्यावरही मास्क पाहायला मिळाले नाहीत.

हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या या सोहळ्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. योगेश मारुती पवार या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. योगेश पवार यांनी या लग्न सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी बार्शी पोलिसात अर्ज केलेला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लग्नात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या लग्नात वेगळा न्याय असे का असा सवाल आता या निमित्ताने विचारला जातोय.