या अभिनेत्याचं नाव ऐकताच रजनीकांत आणि नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपट करण्यास दिलेला नकार, कारण…
बॉलिवूडमधील या अभिनेत्याला प्रचंड घाबरायचे लोक. नाव ऐकताच रजनीकांत आणि नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपटात काम करण्यास थेट दिलेला नकार. कोण आहे हा अभिनेता?

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळेही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार. दमदार आवाज, प्रभावी संवादफेक आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास कचरायचे अशी चर्चा त्या काळात होती. राजकुमार यांनी मदर इंडिया, वक्त, हमराज, हीर रांझा, कुदरत, सौदागर आणि तिरंगा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांच्या 'जानी...' या शैलीतील संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलेल्या माहितीनुसार, तिरंगा चित्रपटाची कथा सर्वप्रथम नसीरुद्दीन शाह यांना ऐकवण्यात आली होती. मात्र, राजकुमार या चित्रपटात असल्याचे समजताच त्यांनी भूमिका स्वीकारण्यास नकार दिला.

त्यानंतर ही ऑफर रजनीकांत यांच्याकडे गेली. त्यांनीही राजकुमार यांच्यासोबत काम करताना सेटवर तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत नम्रपणे चित्रपट नाकारल्याचे मेहुल कुमार यांनी सांगितले होते.

सुमारे 70 चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या राजकुमार यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वाने हिंदी चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवला. वयाच्या 69 व्या वर्षी, 3 जुलै 1996 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांचे चित्रपट, संवाद आणि रुबाबदार शैली आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच जिवंत आहे.