‘वेड’ फेम अभिनेत्रीचा 2 महिन्यांतच मोडला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याने केली फसवणूक?
Jiya Shankar: ऑगस्टमध्ये जिया शंकरने तिचं नातं जगजाहीर केलं होतं. त्यानंतर आता तिने होणाऱ्या नवऱ्याला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Jiya Shankar: रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात झळकलेली आणि 'बिग बॉस' फेम अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच जियाने बॉयफ्रेंड करण धनकसोबत साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र, आता या जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सोशल मीडियावर जियाने शेअर केलेल्या भावनिक पोस्ट आणि करणला अनफॉलो केल्याच्या चर्चांमुळे त्यांच्या नात्यात नेमकं काय घडलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या सगळ्या चर्चांदरम्यान जियाने अखेर मौन सोडलं असून, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरू असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
जिया शंकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टमधील मजकुरामुळे चाहत्यांचे लक्ष तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे वेधलं गेलं. एका पोस्टमध्ये तिने प्रार्थनेची ताकद आणि वेळेनुसार परिस्थिती बदलण्याबद्दलचा संदेश शेअर केला होता.
तर दुसऱ्या पोस्टमध्ये मनाला झालेल्या वेदनांचा उल्लेख होता. काही वेळा आपल्याला केवळ सावरण्याची नाही, तर आपल्यासोबत जे घडलं ते चुकीचं होतं, याची जाणीव इतरांना व्हावी, अशी भावना तिने व्यक्त केली होती.
या पोस्टनंतर चाहत्यांनी जियाच्या आयुष्यात काहीतरी बिनसल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यातच तिने होणारा नवरा करण धनकला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांना आणखी हवा मिळाली.
जिया आणि करणच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही नेटकऱ्यांनी करणने जियाची फसवणूक केल्याचा संशयही व्यक्त केला. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्पष्ट भूमिका मांडली.
माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अलीकडे अनेक अंदाज बांधले जात आहेत. हे अंदाज मी प्रत्यक्षात जे काही शेअर केले आहे, त्यापेक्षा खूप पुढे गेले आहेत, असं तिने म्हटलं. तसंच, माझ्या नात्याबद्दल कृपया कोणतेही अंदाज बांधू नका किंवा अफवा पसरवू नका. काही गोष्टी खासगी असतात आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करावा, अशी विनंतीही तिने केली.
जियाने ऑगस्ट 2026 मध्ये करण धनकसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली होती. रोमँटिक प्रपोजलचे फोटो शेअर करत तिने करणची ओळख आपल्या होणाऱ्या जोडीदाराच्या रूपात करून दिली होती. या फोटोंना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं.