
'झी मराठी' वाहिनवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यज्ञ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रूपालीमधील विरोचक नेत्राला घाबरू लागतो. अशातच नेत्रा आणि इंद्राणीला विरोचकाच्या सेवकाचे रूप घेतलेल्या अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्याचा मार्ग भालबांमुळे सापडतो.

नेत्राबरोबर घरातले सर्वजण गरुडदेवाच्या आरतीची तयारी करतात आणि घरामध्ये गरुडदेवाची मूर्ती आणली जाते. अस्तिकाला नागरूपात आणण्याचा मार्ग सांगितल्यानंतर भालबा आणि मंगला वावोशीला जायला निघतात.

त्याचवेळी रूपाली दारात उभी राहून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करते. पण ते दोघेही ठामपणे रूपालीला तोडीस तोड उत्तर देतात. विरोचकाचा वध माझ्या नेत्राच्या हातून होणारच असा निर्धार ते व्यक्त करून निघून जातात. रूपाली त्यामुळे बिथरते.

त्याच दिवशी अस्तिकाला गरुडाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागतात आणि ती हैराण होते. ती घाबरून रुपालीच्या खोलीत जाते. “विरोचका मला वाचवा” अशी विनंती ती करू लागते. पण अस्तिका आणि रूपाली दोघींनाही नेत्रा आणि इंद्राणीच्या खेळीचा अंदाज येत नाही आणि त्या दोघीही नेत्रा-इंद्राणीने युक्तीने टाकलेल्या जाळ्यात अडकतात.

नागरूपात अस्तिकाला आणण्याची नेत्राची युक्ती यशस्वी होणार का? अस्तिका नागरूपात आल्यावर नेत्रा तिला कोणती शिक्षा देईल? हे प्रेक्षकांना गुरुवारी 22 फेब्रुवारीच्या भागात पहायला मिळणार आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.