
सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जबरदस्त क्रॉस कनेक्शन पहायला मिळतंय. बॉलिवूडमधील बरेच कलाकार साऊथमध्ये काम करतायत. तर साऊथमधील कलाकार बॉलिवूडमध्ये भूमिका साकारत आहेत. आता नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.

'रामायण' या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीला ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने साई पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये काम करणार आहे.

साई ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी ती तीन ते चार कोटी रुपये फी घ्यायची. मात्र बॉलिवूडमधल्या पहिल्यावहिल्या प्रोजेक्टसाठी तिने चांगली फी वाढवल्याचं कळतंय.

साईने 'रामायण' या चित्रपटात सीतेची भूमिका साकारण्यासाठी दहा कोटी रुपये मानधन मागितल्याचं कळतंय. याआधी नयनताराने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात काम करण्यासाठी दहा कोटी रुपये घेतले होते.

'दंगल' फेम नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून केवळ साईच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी काही मोठे कलाकार 'रामायण'मध्ये दिसणार असल्याचं कळतंय. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय.

यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं समजतंय.