कोण म्हणतं सलमान खान आजारी? काऊबॉय लूकमधील डॅशिंग अंदाज समोर
Salman Khan: अभिनेता सलमान खान त्याचा भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी 'अलायन्स' या शोमध्ये पोहोचला आहे. यावेळी त्याचा काऊबॉय लूक विशेष चर्चेत आला आहे. डेनिम शर्ट, पँट आणि काऊबॉय हॅट.. असा हा त्याचा डॅशिंग लूक आहे.

बॉलिवूडचा 'दबंग' सुपरस्टार अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी 'अलायन्स' या शोमध्ये उपस्थित राहिला. गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर हा शो खूप चर्चेत आहे. यामध्ये सलमानचा भाऊ अभिनेता सोहैल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी सलमान त्याच्या संपूर्ण सेक्युरिटीसह 'अलायन्स'च्या सेटवर पोहोचला. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. सध्या यामध्ये कौटुंबिक आठवडा सुरु असून स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांच्या भेटीला येत आहेत.

नुकतंच सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेह या शोमधून बाहेर पडली. त्यानंतर तो भावूक झाला होता. अशा भावनिक क्षणी सलमानची एण्ट्री खूपच खास ठरत आहे. यावेळी त्याचा काऊबॉय लूक पहायला मिळाला. त्याच्या या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डेनिम शर्ट, पँट आणि डोक्यावर काऊबॉय हॅट.. असा त्याचा हा लूक आहे.

एपिसोडच्या शूटिंगसाठी सेटवर प्रवेश करण्यापूर्वी सलमानने पापाराझी आणि फोटोग्राफर्ससमोर पोझ दिले. सलमान अलायन्स या शोमध्ये जवळपास एक तास घालवणार आहे. प्रेक्षकही सोहैल आणि सलमान या दोन भावंडांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो खूपच आजारी आणि थकलेला दिसत होता. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून सलमानने नंतर जिममधील फोटो शेअर केला. त्यानंतर आता त्याचा काऊबॉय लूकमधील हा अंदाज चर्चेत आला आहे.