हुबेहूब सलमान खानच, फक्त 19-20 चा फरक..; भाईजानच्या अत्यंत जवळच्या मित्राचा मुलगा तुफान चर्चेत
हुबेहूब सलमान खानसारखा दिसणारा हा स्टारकिड सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना 90s चा सलमान खान आठवला आहे. हा स्टारकिड कोण आहे, ते जाणून घ्या..

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चर्चा नेहमीच रंगलेली असते. मात्र यावेळी अभिनेता म्हणून नव्हे, तर आपल्या लूकमुळे एका स्टारकिडने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला आणि वरदा खान नाडियाडवाला यांचा धाकटा मुलगा सूफियान नाडियाडवाला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याला पाहून अनेकांना थेट 90च्या दशकातील सलमान खानची आठवण झाली आहे. वीर पहाडियाच्या ‘प्रेम कीटाणु’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी साजिद नाडियाडवाला त्याच्या कुटुंबासह पोहोचला होता.
यावेळी सूफियान कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा लूक, हेअरस्टाइल, शरीरयष्टी आणि एकूणच स्टाइल पाहून नेटकऱ्यांनी त्याची तुलना सलमान खानच्या तरुणपणीच्या लूकशी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सूफियानची सलमान खानशी भेटही झाली.
सोशल मीडियावर सूफियानचे व्हिडीओ समोर आल्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. काही युजर्सनी त्याला ‘90s का सलमान खान’, तर काहींनी ‘सलमान खानचा यंगर व्हर्जन’ म्हटलं. काहींच्या मते दोघांच्या चेहऱ्यात साम्य असण्याबरोबरच त्यांचा स्वॅग आणि बॉडी लँग्वेजही सारखी वाटते.
सूफियान आणि सलमानच्या लूकची तुलना पहिल्यांदाच होत नाहीये. याच वर्षी एप्रिलमध्ये सूफियानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळीही अनेकांनी त्याच्या लूकमध्ये सलमानच्या 90च्या दशकातील शैलीची झलक पाहिली होती. आता पुन्हा त्याचे व्हिडीओ समोर आल्याने ही चर्चा अधिक रंगली आहे.
सूफियानची आई वरदा खान सोशल मीडियावर मुलाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. याआधीही एका युजरने सूफियानला ‘सलमानचा मुलगा’ म्हटलं होतं. त्यावर वरदा यांनी मजेशीर अंदाजात ‘सलमानचा भाचा’ असं उत्तर दिलं होतं. साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान यांची जुनी मैत्री पाहता ही कमेंटही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.
सूफियान हा साजिद आणि वरदा नाडियाडवाला यांचा धाकटा मुलगा आहे. त्याचा मोठा भाऊ सुबान नाडियाडवाला लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. मात्र सूफियानच्या बॉलिवूड एण्ट्रीबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. तो सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.