समंथाने मिटवली लग्नाची प्रत्येक आठवण; वेडिंग गाऊनवर कात्री चालवत बनवला नवीन ड्रेस
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर लग्नाची खास आठवण पुसून टाकली आहे. अभिनेता नाग चैतन्यसोबत लग्न करताना समंथाने जो गाऊन परिधान केला होता, त्याला आता तिने नवीन टच दिला आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांसोबतच फॅशनमुळेही चर्चेत असते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात तिने परिधान केलेल्या काळ्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र या ड्रेसमागील सिक्रेट जाणून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
समंथाने सोशल मीडियावर या ड्रेसचा फोटो पोस्ट करत सांगितलं की हा तिचा आवडला गाऊन आहे. डिझायनर क्रेशा बजाजने तिच्या गाऊनला 'रिपर्पज' (नव्याने डिझाइन) करत नवीन ब्लॅक ड्रेस बनवला आहे.
डिझायनर क्रेशा बजाजनेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाऊनपासून ड्रेस कसा बनवला गेला, त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या ड्रेसची खासियत म्हणजे समंथाने अभिनेता नाग चैतन्यसोबत लग्नात जो वेडिंग गाऊन परिधान केला होता, त्यालाच वेगळं रुप देऊन हा ब्लॅक ड्रेस बनवण्यात आला आहे.
वेडिंग गाऊन हा प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. हे वेडिंग गाऊन खूप महागडे असतात. त्याच्याशी अनेकांच्या भावना आणि आठवणी जोडलेल्या असतात. पण नंतर हा गाऊन कपाटात तसाच पडून राहतो. समंथाने तिच्या लग्नातील या खास गाऊनला आता वेगळा लूक दिला आहे.
समंथाचा हा नवीन ड्रेससुद्धा खूप सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र त्याचसोबत तिने तिच्या लग्नाची चांगली आठवण पुसून टाकल्याचंही काहींनी म्हटलंय. समंथाने लग्नाच्या चार वर्षांनंतर नाग चैतन्यला घटस्फोट दिला.