
अभिनेत्री लक्ष्मी मंचूने दाक्षिणात्य इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतर एका सुपरस्टारच्या पूर्व पत्नीला टॉलिवूड इंडस्ट्रीने बाजूला सारल्याचं तिने म्हटलंय. ‘ग्रेट आंध्रा’ला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीने कोणाचंही नाव न घेता हा दावा केला आहे.

ती अभिनेत्री काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे, परंतु तिला सतत नाकारलं जात आहे, असं लक्ष्मीने सांगितलं. याविषयी ती पुढे म्हणाली, “एका सुपरस्टारची पूर्व पत्नी आहे, जी याच इंडस्ट्रीत काम करते. त्यांचा घटस्फोट झाला आहे. तेव्हापासून तिला कामच मिळत नाहीये.”

इतकंच नव्हे तर ज्या चित्रपटांची ऑफर तिला आधी मिळाली होती, ते ऑफर्ससुद्धा तिच्याकडून हिसकावून घेण्यात आल्याचा दावा लक्ष्मीने केला आहे. “ती चांगलं काम मिळण्याची प्रतीक्षा करतेय. मला तिचं नावसुद्धा घ्यायची गरज नाही”, असं ती पुढे म्हणाली.

हे सर्व ऐकल्यानंतर मुलाखतकर्त्याने तिला विचारलं की, ती समंथा रुथ प्रभूबद्दल बोलतेय का? त्यावर लक्ष्मीने सांगितलं, “तुम्हाला असं वाटतंय की मी समंथाबद्दल बोलतेय. पण यात फक्त एकच सुपरस्टार नाहीये. कमीत कमी पाच ते सहा घटस्फोट झाले आहेत. मी त्या सर्वांच्या जवळची आहे.”

“माझा मूळ प्रश्न हा आहे की एक पुरुष या गोष्टींचा सामना करतो का? घटस्फोटानंतर त्याचं आयुष्य कधीच बदलत नाही. परंतु जेव्हा एका महिलेचं लग्न होतं, तिची मुलंबाळं होतात, सासू-सासरे असतात, तेव्हा तिच्यावरील जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. आम्हाला कोणीच स्वातंत्र्य देत नाही, आम्हाला ते स्वत:हून घ्यावं लागतं”, असं मत लक्ष्मीने मांडलं आहे.