
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात शनिवारी एक अत्यंत आगळावेगळा आणि रोमांचक प्रसंग अनुभवायला मिळाला. आटपाडीची लेक चक्क हेलिकॉप्टरने माहेरी आली. या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर रंगली.

आटपाडी गावचे जावई असलेले आणि मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथील सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव आनंदराव पवार आणि त्यांची पत्नी शशिकला शिवाजीराव पवार हे आपल्या मुलांसह, सौरभ आणि सुयोग पवार यांच्यासह शनिवारी दुपारी आटपाडी येथे दाखल झाले.

विशेष म्हणजे, या कुटुंबाने मामाच्या गावी येण्यासाठी पारंपरिक रस्ते किंवा रेल्वेमार्गाचा वापर न करता, आपल्या नव्याने घेतलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला. आटपाडीच्या आकाशात हेलिकॉप्टर फिरताना पाहून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. यानंतर बघता बघता मोठी गर्दी जमली.

सौरभ आणि सुयोग पवार यांचे मामा, योगेश आणि रवींद्र नांगरे हे आटपाडीत वास्तव्यास आहेत. भाच्यांनी नव्याने घेतलेल्या या हेलिकॉप्टरचे पूजन करण्यासाठी त्यांनी कुटुंबाला खास आटपाडी येथे आमंत्रित केले होते.

नांगरे कुटुंबीयांनी या हेलिकॉप्टरचे पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पूजन केले. त्यानंतर त्यांनी आपला आनंद साजरा केला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, युवा नेते दत्तात्रय पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

शुभेच्छा देण्यासाठी आणि आटपाडीत अवतरलेले हे हेलिकॉप्टर जवळून पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पूर्वी झुक झुक गाडीने मामाच्या गावी जाऊया अशी गाणी गाणाऱ्या पिढीसाठी मामाच्या गावी जाण्याच्या पद्धतीतील हा बदल कौतुकास्पद आणि आश्चर्यकारक ठरला आहे.

हेलिकॉप्टर अवतरल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ कैद करून या ऐतिहासिक क्षणाची आठवण जपली.

यामुळे सांगली शहरात दिवसभर आटपाडीला हेलिकॉप्टर आल्याची चर्चा रंगली होती. वाहन पूजनाच्या परंपरेत आता हेलिकॉप्टर पूजनाची भर पडल्याने आटपाडीकरांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागाच्या बदलत्या चित्राचे हे एक प्रतीक ठरले आहे.