
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरने जीवण संपवल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. तिने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तळहातावर सात ओळींचा एक संदेश लिहिला आहे.

तिने तिच्या तळहातावर लिहिलेल्या नोटवर माझ्यावर पीएसएआय गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर याने चार महिन्यापासून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, तिच्या आतेभावाने माझ्या बहिणीला खासदाराच्या पीएचे फोन यायचे. खासदार पीएच्या फोनवरून बोलायचे आणि शवविच्छेदनाचा अहवाल बदलायला सांगायचे, असाही खळबळजनक दावा केला आहे.

आता याच प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला डॉक्टरची सख्खी बहीणदेखील वैद्यकीय अधिकारी आहे. काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या डॉक्टर असलेल्या तरुणीने आपल्या सख्ख्या बहिणीला कॉल केला होता.

कॉल करून आपल्याला शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी पोलीस तसेच राजकीय दबाव टाकला जात आहे, अशी कल्पना मृत डॉक्टर तरुणीने आपल्या सख्ख्या बहिणीला दिली होती, असा दावा केला जात आहे. मृत डॉक्टरच्या आतेभावाने तसा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.