
तीन दिवसांचा मोठा वीकेंड नुकताच आला. सलग सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने साईचरणी नतमस्तक होत आहेत.

याच दरम्यान साईंच्या झोळीत रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दानही देणगी स्वरूपात भाविक अर्पण करत आहे. त्यातच एका परदेशी भक्त साईचरणी येऊन नतमस्तक झाले. एवढंच नव्हे तर त्यांनी साईंच्या चरणी चक्क सोन्याचा मुकूटही अर्पण केला.

अमेरिका येथील साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी 700 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे. नक्षिकाम असलेला हा सुवर्ण मुकुट पाहताच डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं.

तब्बल 700 ग्रॅम वजन असलेला हा मुकूट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शगोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तो पाहताच डोळ अक्षरश: विस्फारतात.

अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला, या सुवर्णजडित मुकुटाची किंमत सुमारे 1 कोटी 1 लाख 38 हजार रुपये इतकी आहे. यावेळी संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्तांचा साईबाबांची शाल आणि मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

मी लहानपणापासून साईबाबांची भक्त आहे. त्यांना मुकूट अर्पण करण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. अमेरिकेहून मी इथे पती व मुलांसोबत आले आहे आणि हा मुकूट अर्पण केला आहे. त्यांचे आशिर्वाद नेहमी पाठिशी राहोत, अशी मनातील इच्छा अंकिता यांनी व्यक्त केली.