
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेच्या कथानकात अनेक रंजक वळणं येत आहेत. त्यात रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. आशू आणि शिवा देसाई घरी पोहोचतात. वस्तीत आणि शिवाच्या घरच्यांनी आशूचा खूप प्रेमाने पाहुणचार केल्यामुळे त्याला घटस्फोटाचा विषय काढता येत नाही, असं तो सिताईला सांगतो.

सिताई शिवाला तिच्या वचनाची आठवण करून देते आणि आशुला घटस्फोट दे असं सांगते. शिवाला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. शिवा आशुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेते. सिताईच्या हातात सह्या केलेले पेपर देताना शिवा येत्या सहा महिन्यात देसाई घराण्याची सून म्हणून स्वतःला सिद्ध करेन असं चॅलेंज देते.

घरी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शिवा नैवेद्याचं दिंड बनवण्याचं ठरवते. सीताई उर्मिलाला शिवाला मदत न करण्याचा सल्ला देते. शिवा एकदम वेगळ्याच रंगात आणि ढंगात वावरत असते. शिवा पुरणाची दिंड खूप उत्कृष्ट बनवते.

यावरून सीताईला वाटतं की तिला नक्कीच कोणीतरी मदत केली असेल. कीर्ती ती दिंड खराब करण्याचा प्लॅन बनवते. पण शिवा तो प्लॅन तिच्यावरच उलटवून लावते.

उर्मिला सिताईच्या डोक्याला तेल लावत असताना शिवा हळूच येते आणि स्वतःहून सिताईच्या डोक्याला तेल लावते. हे जेव्हा सिताईच्या लक्षात येतं, तेव्हा ती नाराज होते. एकूणच काय तर शिवा एक परिपूर्ण सुनेसारखी वागायला लागल्याचं दिसून येतंय.

देसाईंच्या घरात शिवाची मंगळागौर साजरी करण्याची लगबग सुरु होते. मंगळागौरीच्या कार्यक्रमात सिताई, शिवा आणि सगळ्या बायका मिळून फुगडी खेळतात.

जगदीशची म्हणजेच शिवाच्या काकाची बायको वेळ मिळताच सिताईला शिवाने आमचं घर बळकावलं आहे असं सांगते. यावरून सिताई शिवाला जाब विचारायला जाते, तेव्हा आशू शिवाची बाजू घेऊन जगदीश काका खूप कट कारस्थानी असल्याचं सांगतो.