
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहेत. महिलांवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांबरोबरच, त्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास दिल्याचे नवे प्रकार उघडकीस आले आहेत.

अशोक खरातने शिर्डी, सिन्नर, राहता आणि नाशिक परिसरात शेकडो कोटींच्या स्थावर मालमत्ता जमवल्या. यात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकारही समोर आले आहेत.

शिर्डी परिसरातील एका आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाने अशोक खरातकडून कर्ज घेतले होते. या कुटुंबाकडे एक लॉन (मालमत्ता) होते, ज्यावर खरातचा डोळा होता. कुटुंबाने कर्ज फेडल्यानंतरही खरातने सातत्याने पैशांसाठी तगादा लावला. तो आपल्याला मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पोलिसांशी ओळखी असल्याचे सांगून धमक्या देत होता.

अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून त्या कुटुंबाने लॉन खरातच्या नावावर करून दिले. मात्र, या मानसिक आणि आर्थिक छळामुळे त्या कुटुंबातील दोन सदस्यांनी आत्महत्या केली.

नाशिक शहरातील गौळाणे भागातील शेतकरी कैलास जाधव यांनी एका जागेचा व्यवहार केला होता आणि साठे-खतही पूर्ण झाले होते. मात्र, ही जमीन अशोक खरातला आवडल्याने त्याने परस्पर ती खरेदी करून घेतली. यात कैलास जाधव यांची ४७ लाख रुपयांची फसवणूक झाली.

जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाकडून जमीन व्यवहाराला स्थगिती मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच कैलास जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. कुटुंबीयांचा संशय आहे की, हा अपघात नव्हता तर घातपात होता.

अशोक खरातने अशाच प्रकारे दमदाटी, फसवणूक आणि मानसिक त्रास देऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचे आरोप समोर येत आहेत. पोलिस तपासात आणखी अनेक बळी आणि फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.