
आजकालच्या फॅशनच्या काळात तरुणाईमध्ये नवनवीन डिझाईनचे आणि ब्रँडेड शूज वापरण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते. शूज खरेदी करताना आपण त्याचा लूक, रंग आणि सोईचा विचार करतो.

मात्र, अनेकदा शूजच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या पट्टीकडे (Heel Tab) आपले दुर्लक्ष होते. अनेकांना वाटते की ही पट्टी केवळ सजावटीसाठी दिलेली आहे, पण प्रत्यक्षात तिचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो.

शूजच्या मागे असलेल्या या पट्टीला तांत्रिक भाषेत हील टॅब किंवा पुल लूप असे म्हणतात. याचा मुख्य उद्देश म्हणजे शूज घालताना होणारी ओढाताण कमी करणे.

तुम्ही शूज घालताना ही पट्टी पकडून पाय आत सरकवा. यामुळे शूज सहज पायात बसतात आणि मागचा भाग दुमडला जात नाही. यामुळे शूजचा आकारही दीर्घकाळ टिकून राहतो.

शूज धुतल्यानंतर ते सुकवणे मोठे काम असते. अशा वेळी या पट्ट्यांचा वापर करून तुम्ही शूज दोरीवर लटकवू शकता. यामुळे शूजमधील पाण्याचा लवकर निचरा होतो. तसेच ते चारी बाजूंनी व्यवस्थित सुकण्यास मदत होते.

अनेक नामवंत कंपन्या या पुल लूपवर आपला लोगो किंवा नाव छापतात, ज्यामुळे शूजला एक वेगळी ओळख मिळते. काही ट्रेकिंग शूजमध्ये या पट्टीचा वापर शूज बॅगेला अडकवण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी शूज घालाल, तेव्हा या छोट्याशा पट्टीचा नक्की वापर करा.