
आजच्या धावपळीच्या युगात घराबाहेर पडताना फोन चार्ज करायला विसरणे ही सामान्य बाब झाली आहे. अशा वेळी आपण प्रवासात कारमधील यूएसबी पोर्टचा आधार घेतो आणि फोनचे चार्जिंग करतो.

ही गोष्ट दिसायला सोयीची वाटत असली, तरी ती तुमच्या महागड्या स्मार्टफोनसाठी अत्यंत घातक ठरू शकते. कारमध्ये फोन चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कसे कमी होते, याबद्दल आता तज्ज्ञांनी भाष्य केले आहे.

घरातील सॉकेटमधून येणारा विद्युत प्रवाह हा स्थिर असतो, मात्र कारमधील स्थिती वेगळी असते. कारची शक्ती इंजिनला जोडलेल्या अल्टरनेटरमधून येते. जेव्हा तुम्ही इंजिनचा वेग बदलता किंवा हेडलाइट्स चालू-बंद करता, तेव्हा पॉवरमध्ये मोठे चढ-उतार होतात. हा अस्थिर प्रवाह फोनच्या बॅटरीवर नकारात्मक परिणाम करतो. ज्यामुळे बॅटरी हळूहळू कमकुवत होते.

बहुतेक कारमधील यूएसबी पोर्ट हे प्रामुख्याने म्युझिक सिस्टीम किंवा डेटा ट्रान्सफरसाठी असतात. चार्जिंगसाठी नाही. या पोर्ट्सचा आउटपुट सहसा ०.५ अँपिअर इतका कमी असतो. इतक्या कमी पॉवरमुळे फोन चार्ज व्हायला ४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. जास्त वेळ स्लो चार्जिंगवर राहिल्यामुळे फोनमध्ये उष्णता निर्माण होते, जी बॅटरीच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

अनेकांना इंजिन सुरू असतानाच फोन प्लग इन करण्याची सवय असते. इंजिन सुरू होताना विजेचा एक मोठा धक्का (Power Spike) निर्माण होतो. हा हाय-व्होल्टेज प्रवाह थेट चार्जरद्वारे फोनमध्ये जाऊ शकतो. ज्यामुळे फोनमधील अंतर्गत सर्किट किंवा बॅटरी कायमची खराब होऊ शकते.

उन्हाळ्यात कारमधील तापमान आधीच जास्त असते. अशात जर फोन थेट सूर्यप्रकाशात असेल आणि चार्ज होत असेल, तर तो प्रचंड गरम होतो. ओव्हरहीटिंगमुळे बॅटरीची क्षमता झपाट्याने कमी होते, यामुळे बॅटरी फुगण्याचे प्रकारही घडू शकतात.

जर तुमची कार जुनी असेल आणि इंजिन बंद असताना तुम्ही फोन चार्ज करत असाल, तर त्याचा परिणाम कारच्या बॅटरीवरही होतो. फोन चार्ज करण्यासाठी कारच्या बॅटरीमधून शक्ती ओढली जाते, ज्यामुळे भविष्यात कार स्टार्ट व्हायला अडचण येऊ शकते.

यासाठी नेहमी ब्रँडेड आणि प्रमाणित (Certified) कार चार्जरचाच वापर करा. तसेच कारचे इंजिन सुरू केल्यानंतरच फोन चार्जिंगला लावा. फोन चार्ज होत असताना तो थेट उन्हात किंवा डॅशबोर्डवर ठेवू नका आणि गरज नसल्यास कारमध्ये फोन १०० टक्के चार्ज करणे टाळा.