
आपल्यापैकी अनेकजण मंदिरात किंवा घरात देवाची आरती करताना नकळत डोळे बंद करतात. अनेकांना वाटतं की डोळे मिटल्याने मन अधिक एकाग्र होते. तसेच देवाचे ध्यान अधिक चांगल्या प्रकारे लागते.

पण आरती करताना खरंच डोळे बंद करणे योग्य असतं का? ते केल्याने नेमकं काय होतं? यामागे काही आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक कारणं आहेत का? याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तुविशारद डॉ. बसवराज गुरुजी यांच्या मते, आरती करताना डोळे बंद करणे योग्य नाही. त्यांनी आरती करतेवेळी डोळे बंद न करण्यामागची कारणंही सांगितली आहेत. तसेच आरती योग्य पद्धतीने कशी करावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

षोडशोपचार पूजेतील एक महत्त्वाचा विधी म्हणून आरतीकडे पाहिले जाते. डॉ. गुरुजींच्या मते, आरती करताना मूर्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा किंवा शक्ती जागृत होते. जेव्हा आपण डोळे बंद करतो, तेव्हा आपण ही शक्ती पूर्णपणे ग्रहण करू शकत नाही.

आरती ही केवळ एक प्रथा नसून ती पंचतत्त्वे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचे प्रतीक आहे. डोळे उघडे ठेवून आरती पाहिल्यास या पाचही तत्त्वांची ऊर्जा आपल्याला मिळते.

त्यामुळे आरती करताना डोळे बंद करणे शुभ मानले जात नाही. आरती करताना आपले मन आणि विचार सकारात्मक असणे अत्यंत आवश्यक आहे. डोळ्यांनी देवाच्या मूर्तीचे डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण दर्शन घेतल्याने मन एकाग्र होते.

यामुळे आपण थेट परमेश्वराशी जोडले जातो. धार्मिक शास्त्रांमध्ये आणि सनातन धर्मात आरतीला याच कारणांमुळे महत्त्व दिलेले आहे. आरती करताना आनंद, दुःख किंवा इतर कोणत्याही भावनेमुळे डोळ्यात अश्रू येऊ शकतात.

हे अश्रू नकारात्मक नसून ते परमेश्वराच्या भक्तीचे एक सकारात्मक लक्षण आहे. त्यामुळे, यापुढे देवाची आरती करताना डोळे उघडे ठेवा. आणि त्यातून मिळणाऱ्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घ्या. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)