
अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. परंतु या चित्रपटाची कमाई अत्यंत निराशाजनक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, सर्वाधिक ओपनिंग करेल.. असे सर्व अंदाज फोल ठरताना दिसत आहेत.

सलमानचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने 97.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत बरीच घट झाली.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'च्या हिंदी व्हर्जनने सात दिवसांत 425.1 कोटी रुपये कमावले होते. तर विकी कौशलच्या 'छावा'ने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. या दोघांसोबत तुलना केल्यास सलमानचा चित्रपट अद्याप 100 कोटींचाही टप्पा गाठू शकला नाही.

सलमानच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन 'गजिनी' फेम ए. आर. मुरुगादोसने केलंय. यामध्ये रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शरमन जोशी, सत्यराज, प्रतीक बब्बर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं बजेट जवळपास 180 कोटी रुपये असल्याचं समजतंय.

'सिकंदर'ने पहिल्या दिवशी 26 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 29 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 19.5 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 9.75 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 6 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 3.5 कोटी रुपये कमावले आहेत. सातव्या दिवसाची कमाईसुद्धा 3.75 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय.