
भारतीय संस्कृतीत साप केवळ एक वन्यप्राणी नसून श्रद्धा, कुतूहल आणि भीती यांचे एक अनोखे प्रतीक आहे. नागपंचमीसारख्या अनेक सण, लोककथा आणि दंतकथा यामुळे सापांविषयी आदर निर्माण झाला असला तरी त्याचबरोबर भीती आणि अंधश्रद्धाही वाढल्या आहेत.

साप दिसला की तो नक्कीच जीवघेणा असतो किंवा चावला की मृत्यू निश्चितच असे गैरसमज समाजात खोलवर रुजले आहेत. मात्र, हे गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतात आढळणाऱ्या सापांच्या शेकडो प्रजातींपैकी केवळ काहीच प्रजाती विषारी आहेत.

बहुतांश साप हे निरुपद्रवी असून शेतातील उंदीर आणि कीटक नियंत्रित करून ते शेतीसाठी अत्यंत उपकारक ठरतात. आज नागपंचमीच्या निमित्ताने सापांविषयीच्या गैरसमजांना दूर सारून त्यांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.

गोंदिया जिल्ह्यात सापांच्या सुमारे 18 विविध प्रजाती आढळतात. यापैकी 5 प्रजाती विषारी आहेत, 2 प्रजाती निम्नविषारी आहेत, तर उर्वरित 11 प्रजाती पूर्णपणे बिनविषारी आहेत. गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रमुख प्रजातीपैकी चार साप अत्यंत विषारी मानले जातात.

यातील मण्यार हा साप काळसर निळसर रंगाचा असून त्याच्या शरीरावर पांढरे आडवे पट्टे असतात. याचे दात लहान असल्याने चावल्यास सुरुवातीला लक्षात येत नाही. मण्यार साप रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो.

घोणस अतिशय रागीट आणि जलद हालचाल करणारा साप असतो. याचे दात मोठे आणि लवचिक असतात. धोका जाणवल्यास हा साप कुकरसारखा आवाज करतो. याला स्थानिक भाषेत 'परड' असेही म्हटले जाते.

प्रसिद्ध फणा काढणारा साप म्हणून नाग ओळखला जातो. आपले संरक्षण करण्यासाठी हा साप उग्र रूप धारण करतो आणि फणा काढून उभा राहतो. तर फुरसे हा भारतातील सर्वात कमी लांबीचा विषारी साप आहे. हा सहसा दगड किंवा खडकांखाली लपलेला आढळतो.

याव्यतिरिक्त, दोन निम्नविषारी सापांच्या प्रजातीही गोंदिया जिल्ह्यात आढळतात. ज्यांचा दंश सहसा जीवघेणा नसतो. उर्वरित 11 प्रजाती पूर्णपणे बिनविषारी असून, त्या मानवासाठी कोणताही धोका निर्माण करत नाहीत.