
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे. जागा वाटपात मात्र मोठी असमानता दिसून येत आहे. मनसेच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बऱ्याच जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.

आता कमी जागांमुळे मनसेमध्ये पसरलेली नाराजी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यातून दिसू लागली आहे. काल माजी नगरसेविका स्नेहल जाधव यांनी तडकाफडकी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्या आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, विश्वासू म्हणून ओळखले जायचे.

वॉर्ड क्रमांक 192 हा मनसेलाच सुटला आहे. मनसेकडून या जागेसाठी यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होताच अनुभवी नेत्या स्नेहल जाधव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा वॉर्ड दादर भागात येतो. मुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या 20 वर्षांपासून जाधव कुटुंबाचा या वॉर्डवर प्रभाव आहे. 1992 ते 2007 या काळात स्नेहल जाधव स्वतः तीन वेळा नगरसेविका होत्या. तर 2007 ते 2012 मध्ये त्यांचे पती श्रीधर जाधव या वॉर्डातून निवडून आले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.