
महाराष्ट्राचे लाडके होम मिनिस्टर अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी लवकरच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार आहेत. अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आणि निर्माता-अभिनेता सोहम बांदेकर हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

सोहम बांदेकर हा मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी ही बांदेकर कुटुंबाची सून होणार आहे. सध्या सोहम आणि पूजाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

सध्या या दोघांच्याही केळवणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वी सोहमचं केळवण त्याच्या लाडक्या मावशींनी नुकतंच केलं होतं. त्यानंतर आता येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर पूजा बिरारीचे धूमधडाक्यात केळवण साजरं केलं.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेच्या सेटवर झालेल्या या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावेळी सेटवरील सहकलाकारांनी पूजासाठी खास मेजवानी आयोजित केली. तिला प्रेमाने भेटवस्तू दिल्या.

पूजा बिरारी ही सध्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा आणि साजणा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

तर सोहम बांदेकर याने निर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. तो ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या मालिकांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळतो. ललित 205 या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. तसेच 'नवे लक्ष्य' मालिकेत त्याने अभिनयही केला आहे.