
गेल्या २४ तासांपासून सोलापूर शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाने सोलापूर शहरात हाहाकार माजवला आहे. सोलापुरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शहराच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोलापुरात रात्रभरात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत.

सोलापूर शहरातील शेळगी भागासह अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या या दृश्यांमध्ये पावसाचा हाहाकार स्पष्टपणे दिसत आहे. सोलापुरातील अनेक घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगर आणि २५६ गाळा परिसरातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. या भागातील टॉवेल आणि विडी कारखान्यांमध्येही ५-६ फूट पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तातडीने पाहणी दौरा केला. त्यांनी नागरिकांना धीर देत तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले.ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, शहरातील पूर्व भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अक्कलकोट रोडवरील एका टॉवेल कारखान्याच्या मालकाने सांगितले की, नवीन रस्त्याचे काम झाल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाली. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच महापालिकेकडे तक्रार केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे त्यांच्या कारखान्यातील सुमारे २५ लाख रुपयांचा माल पाण्यात वाहून गेला आहे.

तसेच या ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने घरातील धान्य आणि इतर सामानही पूर्णपणे भिजले आहे. शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येत आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्तांनी दिली.

सोलापुरात काही ठिकाणी हायवेची कामे झाली आहेत, पण क्रॉसलाईन न टाकल्यामुळे ही गंभीर परिस्थिती उद्भवली. यावर उपाय म्हणून लवकरच अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.