
भारताचे व्यापार विश्व दिवसेंदिवस वाढत आहे. निर्यात वाढवण्यासोबतच भारत देश आत्मनिर्भर भारत मिशनअंतर्गत सर्वच क्षेत्रात स्ववलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला आली आहे.

परंतु आता लवकरच भारत हा जगातील सर्वात मोठी आणि पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होऊ शकतो, असे भाकित अमेरिकेतील एका बड्या उद्योजकाने वर्तवले आहे. विशेष म्हणजे या उद्योजकाने भारताच्या धोरणाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी कार्लिल ग्रुपचे सहसंस्थापक डेव्हिड रुबेनस्टीन यांनी हे भाकित केले आहे. त्यांच्या मतानुसार भारत खूप वेगाने प्रगती करत आहे. येणाऱ्या दोन ते तीन दशकांत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरू शकतो. सध्या दावोसमध्ये चालू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये (WEF) एका मुलाखतीत बोलत होते.

मी हयात असतानाच म्हणजे आगामी वीस ते तीस वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरू शकतो, असे डेव्हिड म्हणाले आहेत. सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन तर तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांची अर्थव्यवस्था आहे.

रुबेनस्टीन यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवरही भाष्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांबाबत नेहमीच सकारात्मक असतात. त्यांनी आपल्या खूप जवळच्या सहकाऱ्याला भारतात राजदूत म्हणून पाठवले आहे, असे सांगत अमेरिका आणि भारत यांच्यात सकारात्मक संबंध आहेत, असे सांगितले.