
भारतीय संस्कृतीत कपाळावर टिळा लावण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आणि अर्थपूर्ण आहे. केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही टिळा लावणे फायदेशीर मानले जाते.

मानवी शरीरातील सात चक्रांपैकी अग्नी चक्र हे कपाळाच्या मध्यभागी स्थित असते. त्यामुळे कपाळाच्या मध्यभागी टिळा लावल्याने एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याच्या प्रत्येक वारानुसार विशिष्ट प्रकारचे टिळक लावल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होऊन सकारात्मक लाभ मिळतात.

सोमवार हा चंद्राचा वार आहे. मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शांतीसाठी या दिवशी पांढऱ्या चंदनाचा किंवा विभूतीचा टिळा लावावा. यामुळे नकारात्मक विचार दूर होतात.

मंगळवार या दिवसाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी मंगळवारी लाल चंदनाचा टिळा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. बुधवार हा बुद्धीची देवता गणपतीचा दिवस आहे. बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी सुक्या सिंदूराचा टिळक लावावा.

गुरुवार हा दिवस गुरु ग्रहाशी संबंधित आहे. गुरुवारी हळद किंवा केशर मिश्रित पांढऱ्या चंदनाचा टिळक लावावा. यामुळे मानसिक प्रसन्नता मिळते. तसेच सकारात्मक विचार वाढतात. तसेच सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी लाल चंदन किंवा सिंदूर लावावे. यामुळे तणाव कमी होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

शनिदेवाच्या कृपेसाठी आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विभूती किंवा लाल चंदनाचा टिळक लावणे लाभदायक ठरते. तसेच रविवार हा दिवस ग्रहांचा राजा सूर्याचा आहे. प्रगती आणि भाग्योदयासाठी रविवारी लाल चंदनाचा टिळक लावावा, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही कपाळावर टिळा लावणे फायदेशीर ठरते. कपाळाच्या ज्या ठिकाणी आपण टिळा लावतो, तिथे आज्ञाचक्र असते, जे थेट आपल्या मेंदूतील पिनिअल आणि पिट्युटरी ग्रंथींशी संबंधित असते. टिळा लावताना या बिंदूवर हलका दाब पडल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारते. तसेच डोकेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)