
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं आहे. यासाठी संघांनी तयारीही केली होती.बांगलादेशमध्ये 3 ते 19 ऑक्टोबर दरम्यान महिला T20 विश्वचषक होणार आहे, ज्यामध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियासह 10 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा समावेश आहे.

बांगलादेशमध्ये आता क्रिकेट खेळणं वाटतं तितकं सोपं नाही. ज्या देशात पंतप्रधानांना देश सोडण्याची वेळ आली. त्या देशात इतरांचं काय खरं नाही हे दिसत आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे ऑपरेशन अध्यक्ष जलाल युनूस यांनीही आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. असं असाताना ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने बांगलादेशमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

बांगलादेशमध्ये महिला टी20 विश्वचषक खेळणे योग्य नाही, असे एलिसा हिलीला वाटते. टी20 विश्वचषकाचे आयोजन केल्यास बांगलादेशवर अधिक दबाव येईल. बांगलादेश हिंसाचारांच्या घटनांमधून अजूनही सावरलेला नाही. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तिथे खेळण्याचा विचार करणे माझ्यासाठी कठीण आहे, असं एलिसा हिलीने सांगितलं.

आयसीसी मंगळवारी (20 ऑगस्ट) या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारताने यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये या स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.