
केएल राहुल दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. आता केएल राहुल आशिया चषक स्पर्धेतून संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. 31 वर्षीय केएल राहुल आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

शस्त्रक्रियेनंतर केएल राहुल पुन्हा एकदा तंदुरुस्त झाला आहे. तसेच त्याला आशिया कप स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

आशिया कप 2023 स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सामना होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे. 2 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

केएल राहुलचे टीम इंडियात पुनरागमन झाल्यास संघाला थोडा दिलासा मिळणार आहे. कारण यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला आधीच मोठा धक्का बसला आहे. आता राहुलच्या पुन: प्रवेशामुळे संघातील मधली फळी मजबूत होईलच, त्या शिवाय तो विकेटकीपिंगही करेल.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केएल राहुल प्रशिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फलंदाजी आणि सराव करत आहे. राहुल स्वत: सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून याची माहिती देत आहे.

राहुलने टीम इंडियासाठी एकूण 54 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 45.13 च्या सरासरीने 1986 धावा केल्या आहेत.