
अहमदाबादमधील चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा जरा हटके ठरला. या सामन्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली. त्यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी एल्बनीज हे देखील होते. या दोघांच्या उपस्थितीने स्टेडियममध्ये एकच माहोल दिसून आला.

दोन्ही देशाचे पंतप्रधान सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी स्टेडियममध्ये पोहचले. दोघांसह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते. या दिग्ग्जांच्या स्वागतासाठी बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

मैदानात गरबा क्वीन फाल्गुनी पाठक हीने आपल्या परफॉर्मेन्सने चार चाँद लावले. या कार्यक्रमादरम्यान मोदींनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला कॅप घातली. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला टोपी दिली. यानंतर दोन्ही पंतप्रधान आणि दोन्ही कर्णधारांनी फोटो काढला.

यानंतर मोदी आणि एल्बनीज या दोघांनी गोल्फ कारमधून मैदानात फेरफटका मारला. या दरम्यान दोन्ही संघ मैदानात आले. कॅप्टन रोहितने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंसह भेटवलं. यावेळेस मोदींनी खेळाडूंसह हस्तांदोलन केलं. तसेच मोदी राष्ट्रगीतासाठी सोबत थांबत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

यानंतर दोन्ही पंतप्रधान स्टँडमध्ये बसले. दोघांनी एकत्र सेल्फी काढला. त्यानंतर 10 वाजता दोघेही स्टेडियममधून निघाले. अशा प्रकारे मोदी एकूण दीड तास मैदानात उपस्थित राहिले.