
मेलबर्न कसोटी सामना भारताच्या हातून वाळूसारखा निसटत चालल्यासारखं दिसत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला आहे. ऑस्ट्रेलियाने 450 पार धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथने या सामन्यात शतकी खेळी केली.

स्टीव्ह स्मिथने 167 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने कसोटी क्रिकेटमधील आपले 34 वे शतक पूर्ण केले. मालिकेतील त्याचं हे सलग दुसरं शतक आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.

स्टीव्ह स्मिथने शतक ठोकताच एका विक्रमाची नोंद केली आहे. भारताविरुद्ध त्याचं 11 वं शतक आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या जो रूटला या बाबतीत मागे टाकले आहे.

स्टीव्ह स्मिथच्या शतकापूर्वी हा विक्रम जो रूटच्या नावावर होता. त्याने भारताविरुद्ध 10 शतकं झळकावली आहे. पण आता स्टीव्ह स्मिथ 11 शतकांसह आघाडीवर आहे. रिकी पाँटिंग, गॅरी सोबर्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांनी भारताविरुद्ध प्रत्येकी 8 शतकं झळकावली आहेत.

स्टीव्ह स्मिथने घरच्या मैदानावर शेवटच्या 10 पहिल्या डावात भारताविरुद्ध 7 शतके झळकावली आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आता स्टीव्ह स्मिथच्या नावावर आहे. त्याने याबाबतीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

स्मिथने आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध 10 शतके झळकावली आहेत. या मालिकेत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी 9 शतके झळकावली आहेत. स्मिथने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतकही ठोकले होते.