
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीआधी शेवटची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला. त्यानंतर आता टीम इंडियासाठी आणखी एक डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अनफिट झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील टॉसनंतर याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला दुखापतीमुळे तिसऱ्या वनडे सामन्याला मुकावं लागलं आहे. वरुण उजव्या पायाच्या दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध नव्हता, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

वरुणने इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने एकूण 5 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या. त्यानंतर वरुणची अचानक एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली.

त्यानंतर बीसीसीआयने ऐनवेळेस वरुण चक्रवर्ती याचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश केला. वरुणसाठी चक्क फलंदाज यशस्वी जयस्वाल याला मुख्य संघातून बाहेर करण्यात आलं.