
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चार वर्षानंतर क्रिकेटमध्ये आमनसामने येत आहेत. 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी काही नवोदीत खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्या कामगिरीवर त्यांचं कसोटीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्या तआली आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्यासोबत आणखी दोन नवोदीत खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

सराव सामन्यात यशस्वी जयस्वाल याला लवकर मैदानात उतरवण्याचा टीम इंडिया व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. यातून युवा फलंदाजाला पहिल्या कसोटी सामन्यात खेळवण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जयस्वालने ओपनिंग केली तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल अशी शक्यता आहे.

कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीच्या स्थानासाठी निवड करण्यात आली होती. पण ऋतुराजला सराव सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऋतुराजऐवजी यशस्वी संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे.

टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक म्हणून खूप स्पर्धा आहे. केएस भरतने आपल्या विकेटकीपिंग कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. पण फलंदाजीत त्याची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे टीम इंडियात इशान किशनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत भारताकडून पदार्पण करणारा मुकेश कुमार हा तिसरा खेळाडू आहे. मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे तिसऱ्या गोलंदाजासाठी मुकेश, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यात स्पर्धा आहे. मुकेश सध्या फॉर्मात असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.