
भारत आस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिला सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 2 गडी राखून विजय मिळवला. या विजयात रिंकू सिंह याने मोलाची भूमिका बजावली. 4 षटकात 44 धावा आवश्यक असताना रिंकू सिंह मैदानात उतरला होता. त्याने फिनिशिंग खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

रिंकू सिंहने विशाखपट्टणममध्ये 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार ठोकले. तसेच शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. पण नो बॉल असल्याने त्या षटकाराला तसा काही अर्थ उरला नाही. पण शेवटच्या चेंडूवर हाय टेन्शन असताना षटकार मारणं वाटतं तितकं सोपं नाही.

रिंकू सिंह याने आतापर्यंत 6 टी20 सामने खेळले आहेत. त्यात तीन सामन्यात त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. या तिन्ही सामन्यात त्याने फिनिशिंग खेळी केली. रिंकू एशियन गेम्समध्ये नेपाळ विरुद्ध आणि डबलिनमध्ये आयर्लंड विरुद्ध फलंदाजीसाठी उतरला होता.

नेपाळ विरुद्ध खेळताना रिंकू सिंहने 15 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. यात दोन चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर आयर्लंड विरुद्ध रिंकून 21 चेंडूत 38 धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

रिंकू सिंह या तिन्ही सामन्यात रिंकू सिंह नाबाद होता. म्हणजेच तिन्ही सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याच्याकडे टीम इंडियाचा फिनिशर म्हणून पाहिलं जात आहे.

आयपीएलमध्येही रिंकू सिंह याने फिनिशरची भूमिका बजावली आहे. गुजरात टायटन्स विरोधात खेळताना एका षटकात पाच षटकार ठोकत कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. शेवटच्या पाच चेंडूवर 5 षटकार ठोकले होते.