
आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरुवात लवकरच होणार आहे. यासाठी दहा संघ सज्ज असून मिनी लिलावात खेळाडूंची खरेदीही केली आहे. कोट्यवधी रुपयांची उधळण करत दिग्गज खेळाडूंचा भरणा आपआपल्या संघात केला आहे. पण या स्पर्धेपूर्वीच विराट कोहलीच्या आरसीबी संघाला धक्का बसला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल लिलावात 1.50 कोटी रुपये खर्च करून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम कुर्रनला आपल्या संघात घेतलं आहे. त्याच्या संघात येण्याने बाजू भक्कम होईल असं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पण आता या आशेवरच पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे टॉम कुर्रनने बिग बॅश लीग अर्ध्यावरच सोडली आहे. सिडनी सिक्सर्स फ्रेचायसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील उपचारासाठी आता तो इंग्लंडला परतला आहे.

इंग्लंडकडून 30 टी20 सामने खेळत टॉम कुर्रनने 29 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 13 डावात 64 धावा केल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू असल्याने कोट्यवधींची रक्कम मोजली होती. आयपीएलमध्ये केकेआर, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी एकूण 13 सामने खेळलेल्या टॉम करनने 127 धावा केल्या असून 13 विकेट घेतले आहेत.

आरसीबीला अद्याप एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेल्या 16 व्या पर्वात जेतेपदासाठी धडपड सुरु आहे. पण प्रत्येकवेळी पदरी निराशा पडली आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही जेतेपद जिंकता न आल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार दीपराज, मोहम्मद वैशाख, मोहम्मद अकादमी, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुर्रन, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.