
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील आणखी एक हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. 7 एप्रिलला हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात जेसीबी खेळण्याची शक्यता आहे. म्हणजेच जसप्रीत बुमराह, दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्ट मुंबई संघाचं गोलंदाजीत प्रतिनिधित्व करतील.

तिन्ही वेगवान गोलंदाज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करतील. किंग कोहली विराट कोहलीने आतापर्यंत या तिघांना मिळून 210 चेंडूंचा सामना केला आहे. यात त्याला फक्त 281 धावा करता आल्या आहेत. तसेच 7 वेळा बाद झाला आहे.

जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली 16 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यावेळी 95 चेंडूंचा सामना करणाऱ्या कोहलीने फक्त 140 धावा केल्या आहेत. दरम्यान, बुमराहने 5 वेळा विराट कोहलीची विकेट घेतली आहे.

दीपक चहरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 85 सामने खेळले आहेत आणि 81 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यातील 63 विकेट्स पॉवरप्लेमध्ये घेतल्या आहेत. त्यामुळे पहिल्या 6 षटकांतच चहरचा सामना करणं आरसीबीच्या फलंदाजांना कठीण जाणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये विदेशी गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ट्रेंट बोल्टच्या नावावर आहे. बोल्टने पॉवरप्लेमध्ये 107 डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. यात त्याने 64 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वात घातक गोलंदाजीचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने पॉवरप्लेमध्ये तब्बल 76 विकेट्स घेतल्या आहेत. यासह आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.