
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भारत दौऱ्यावर येण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार असून हा दौरा 12 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्यांदा कोलकात्याला जाणार आहे. त्यानंतर अहमदाबाद, दिल्ली आणि मुंबईला जाणार आहे. 'जीओएटी टूर ऑफ इंडिया 2025' असं या दौऱ्याचं नाव आहे. (फोटो- पीटीआय)

लिओनेल मेस्सी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारत दौरा केला होता. यावेळी वेनेजुएलाविरुद्ध एक मैत्रिपूर्ण सामना खेळला होता. आता पुन्हा एकदा भारतीय तरुणांना प्रेरणा देण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. (फोटो- पीटीआय)

मेस्सी 12 डिसेंबरच्या रात्री कोलकात्याला पोहोचणार आहे. 13 डिसेंबरला मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होईल. हा फूड आणि टी फेस्टिव आहे. यात बंगाली खाद्यपदार्थ असतील. तसेच आसामचा चहा आणि अर्जेंटिनाचा मेट चहाचं मिश्रण असेल. (फोटो- पीटीआय)

ईडन गार्डन्स किंवा सॉल्ट लेक स्टेडियमवर आयोजित 'GOAT कॉन्सर्ट' आणि 'GOAT कप'चं आयोजन केलं जाईल. मेस्सी सात खेळाडूंच्या संघासह सॉफ्ट टच सामना खेळेल. या सामन्यात सौरव गांगुली, लिएंडर पेस, जॉन अब्राहम आणि बायचुंग भुतियासारखे दिग्गज देखील सहभागी होतील. हा सामना पाहण्याची इच्छा असेल तर त्याची तिकिटाची किंमत 3500 रुपये आहे. (फोटो- पीटीआय)

कोलकात्यानंतर पुढचा दौरा हा 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी अहमदाबादला असेल. मेस्सी अदानी फाउंडेशनच्या एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होईल. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी मुंबईत येईल.दुपारी 3.45 वाजता सीसीआय ब्रेबॉर्न येथे 'मीट अँड ग्रीट' आणि सायंकाळी 5.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर 'गोट कप' आणि संगीत कार्यक्रम होईल. (फोटो- पीटीआय)

15 डिसेंबर रोजी मेस्सी नवी दिल्लीत असेल, जिथे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेल आणि दुपारी 2.15 वाजता फिरोजशाह कोटला स्टेडियमवर 'GOAT कप' आणि संगीत कार्यक्रमात सहभागी होईल. (फोटो- पीटीआय)