
भारतीय क्रिकेट संघाने विंडीज विरुद्ध मायदेशातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेची दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिला सामना अडीच दिवसांत जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताने हा सामना डाव आणि 140 धावाने जिंकला. भारताच्या या विजयात ऑलराउंडर आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा याने निर्णायक भूमिका बजावली. (Photo Credit : PTI)

जडेजाने सलामीच्या सामन्यात शतक झळकावलं. जडेजाने 104 धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे जडेजाकडून दुसऱ्या कसोटीतही अशाच ऑलराउंड कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Photo Credit : PTI)

उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 10 ऑक्टोबरपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. जडेजाला या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जडेजाला विक्रमासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. (Photo Credit : PTI)

जडेजा कसोटी कारकीर्दीत 4 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. जडेजाने आतापर्यंत 3 हजार 990 धावा केल्या आहेत. जडेजा 10 धावा करताच माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. जडेजा कपिल देव यांच्यानंतर कसोटीत 4 हजार धावा आणि 300 विकेट्स घेणारा पहिला आणि एकूण दुसरा भारतीय ठरेल. (Photo Credit : PTI)

जडेजाने कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 86 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 990 धावा केल्या आहेत. तसेच या दिग्गज ऑलराउंडरने 334 विकेट्स मिळवल्या आहेत. तर कपिल देव यांनी त्यांच्या कारकीर्दीतील 131 कसोटी सामन्यांमध्ये 5 हजार 248 धावा केल्या होत्या. तसेच 434 विकेट्सही मिळवल्या. (Photo Credit : PTI)