
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 17 पर्वात आरसीबीची झोळी रितीच राहिली आहे. आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे आरसीबीने नव्या पर्वात नव्याने संघ बांधला आहे. पण असं असताना दोन खेळाडूंमुळे आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

आरसीबीने आयपीएल 2025 मेगा लिलावात जोश हेझलवूडसाठी 12.50 कोटींची बोली लावली. कारण आयपीएलमध्ये दोन बाउंसर टाकण्याची परवानगी आहे. त्यामुळे गोलंदाजाला स्कोअर दाबण्याची संधी मिळते. पण हेझलवूड दुखापतग्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू युवा खेळाडू जेकब बेथेल हा देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. बेथेल भारताविरूद्धच्या मालिकेला आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला आहे. आरसीबीने मेगा लिलावात जेकबसाठी 2.60 कोटींची बोली लावली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलेले हे दोन्ही खेळाडू यावर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतील का? हा प्रश्न आहे. आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांना पूर्ण तंदुरुस्त झाल्याशिवाय आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देणार नाही.

हेझलवूड आणि बेथेल आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. आयपीएल सुरू होण्यास अजून एक महिना शिल्लक आहे. तिथपर्यंत दोन्ही खेळाडू फिट झाले तर आरसीबीकडून खेळू शकतील. अन्यथा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला या खेळाडूंचा पर्याय शोधावा लागेल.