
आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. पहिल्यांदाच कधीही जेतेपद न मिळालेले संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

अंतिम सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने विजयाचा कौल दिला आहे. वॉटसनच्या मते यंदाचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे असेल यात काही शंका नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पण काही सामन्यांमध्ये चुकाही केल्या आहेत. असं असताना प्लेऑफमध्ये त्या चुकांची दुरूस्ती जोरदार कमबॅक केलं आहे. जोश हेझलवूडच्या आगमनाने आरसीबीची ताकद वाढली आहे.

17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावाधीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपदाची चव चाखता येईल असं त्याने भाकीत वर्तवलं आहे. इतकंच काय तर या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार विराट कोहलीला मिळेल याबाबतही त्याने भविष्य वर्तवलं आहे.

आता 17 वर्षांची जेतेपदाची भूक कोण शमवतो याकडे लक्ष लागून आहे. पंजाब किंग्सनेही क्वॉलिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे हा सामना वाटतो तितका सहज जिंकता येईल असं नाही. त्यामुळे या सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क/कन्नड)