
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 412 धावांचं विक्रमी लक्ष्य दिलं. या धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना फोडून काढलं. स्मृती मंधानाने मालिकेतील दोन सामन्यात सलग शतक ठोकलं आहे.

स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक 13वं शतक ठोकलं. या शतकासह तिने सुझी बेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता तिच्या पुढे फक्त मेग लेनिंग असून तिने 15 शतकं ठोकली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हा विक्रम स्मृती तिच्या नावावर करू शकते.

स्मृती मंधानाने महिला क्रिकेटमधील दुसरं वेगवान शतक ठोकलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंगने यापूर्वी 45 चेंडूत शतक ठोकलं आहे. त्यानंतर आता स्मृती मंधानाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. तिने 50 चेंडूत शतकी खेळी केली.

भारतीय क्रिकेट विश्वातील वनडे क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक गणलं गेलं आहे. या बाबतीत स्मृती मंधानाने विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवागलाही मागे टाकलं आहे. स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडूत शतक पूर्ण केलं. तर विराट कोहलीने 52 चेंडूत, तर वीरेंद्र सेहवाने 60 चेंडूत शतक ठोकलं होतं.

स्मृती मंधानाने फक्त 23 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. यात दोन षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक होते. (सर्व फोटो- बीसीसीआय ट्वीटर)