
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थवर होणार आहे. यासाठी टीम इंडिया शुबमन गिलच्या नेतृत्वात सज्ज आहे. असं असताना टीम इंडियाची नवी जर्सी समोर आली आहे.

पर्थच्या ऑप्ट्स स्टेडियममध्ये ध्रुव जुरेल आणि नितीश रेड्डी टीम इंडियाच्या नव्या जर्सीत दिसले. या जर्सीवरील नवी डिझाईनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. जर्सीच्या खांद्यावर तिरंग्याचे शेड्स आहेत. तसेच समोर मोठ्या अक्षरात नव्या स्पॉन्सर्सचा लोगो आहे.

भारत सरकारने नवं बिल पास केल्यानंतर ड्रीम इलेव्हनचा करार वेळेआधीच संपुष्टात आला होता. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया विना स्पॉनर्स लोगोसह खेळली होती. पण आता संघाला अपोलो टायर्सच्या रुपाने नवा जर्सी स्पॉन्सर मिळाला आहे. त्यामुळे जर्सीवर अपोलो टायर्सचं ठळक अक्षरात नाव छापलं आहे.

अपोलो टायर्ससोबत बीसीसीआयने 579 कोटींचा करार केला आहे. हा करार 2027 पर्यंत असणार आहे. म्हणजेच वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत असणार आहे. अपोलो टायर्स कंपनी प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 4.5 कोटी रुपये देणार आहे.

टीम इंडियाच्या नव्या जर्सीत विराट कोहली आणि रोहित शर्माचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही दिग्गज फार फार तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत खेळू शकतात. या दरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा होणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्या जर्सीत शेवटचा दौरा असणार आहे. (PC-PTI)