
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज असून 15 खेळाडूंची घोषणाही झाली आहे. लवकरच टीम इंडिया दोन टप्प्यात अमेरिकेला रवाना होणार आहे. स्पर्धेपूर्वी टीम इंडिया एक सराव सामना खेळणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया अ गटात असून आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आमनेसामने असणार आहेत. भारत साखळी फेरीत या संघांशी भिडणार आहे.

टीम इंडियाचा स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. 9 जूनला पाकिस्तान, 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध लढत होईल.

टीम इंडिया पहिल्यांदाच अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध टी20 सामना खेळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये भारतीय खेळाडूंचा भरणा आहे. चला जाणून घेऊयात पाच खेळाडूंबाबत

12 जूनला भारताचा सामना अमेरिकेशी होईल. या सामन्यात 4 भारतीय खेळाडू समोर असणार आहे. यापैकी एक मिलिंद कुमार हा आहे. मिलिंद कुमारने दिल्ली आणि सिक्कीमकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहे. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला आहे. आता टी20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध अमेरिकेकडून खेळेल.

हरमीत सिंगलाही संघात स्थान मिळालं आहे. हरमीत सिंग 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो मुंबई आणि त्रिपुराकडून खेळला आहे.

अमेरिकन संघात मोनोक पटेल आणि सौरभ नेत्रावलकर यांचाही समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी भारतात भरपूर क्रिकेट खेळले आहे. मोनोंक पटेल गुजरातकडून 16 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील संघात खेळला. त्यानंतर 2016 मध्ये अमेरिकेत गेला आणि आता विश्वचषकात यूएसए संघाचे नेतृत्व करेल.

सौरभ नेत्रावलकर 2010 च्या अंडर19 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला होता. रणजी ट्रॉफीमध्येही तो मुंबईकडून खेळला होता. आता टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध अमेरिकेकडून खेळणार आहे.

भारतात भरपूर क्रिकेट खेळलेल्या परगट सिंगने आता कॅनडाच्या संघात स्थान मिळवले आहे. परगट सिंगने 2015-16 रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र आता तो भारताविरुद्धच्या टी20 विश्वचषकात कॅनडाकडून खेळणार आहे.