
विराट कोहलीचा 300 वा एकदिवसीय सामना त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीने काही खास झाला नाही. पण क्षेत्ररक्षणात झेल पकडून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 12 व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले.

टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना नवव्या क्रमांकावर मैदानात आलेल्या न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीचा झेल विराट कोहलीने पकडला. या झेलसह, किंग कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे.

याआधी हा विक्रम टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावावर होता. भारतासाठी 504 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या राहुल द्रविडने एकूण 333 झेल घेऊन विक्रम केला. आता विराट कोहलीने हा विक्रम पुसून टाकला आहे. टीम इंडियासाठी 548 सामने खेळणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 334 झेल घेतले आहेत. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय आणि जगातील पाचवा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बनला.

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 159 झेल घेऊन मोठे यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगच्या 160 झेल घेण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातच मोडण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेचा महेला जयवर्धने अव्वल स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 352 सामने खेळणाऱ्या जयवर्धनेने एकूण 440 झेल घेतले आहेत.महेला जयवर्धनेनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 218 झेल घेऊन हा विक्रम केला आहे.