
नीरजा सेठी या फार पूर्वी रतन टाटा यांच्या टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेजमध्ये (TCS) काम करत होत्या. त्यांनी पतीसोबत मिळून घरातूनच सिंटेल (Syntel) नावाची IT कंपनी सुरु केली. 2018 मध्ये फ्रान्सची दिग्गज आयटी फर्मने ही कंपनी खरेदी केली.

आज नीरजा सेठी या 8,395 कोटी रुपयांच्या मालकीण आहेत. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांपैकी त्या एक आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांचे नाव अनेकदा आले आहे. 69 वर्षाच्या नीरजा मूळ भारतीय वंशाच्या आहेत. त्या आज अब्जाधीश आहेत.

नीरजा सेटी यांनी दिल्ली विद्यापीठातून गणित या विषयात पदवी मिळवली. तर ऑपरेशन रिसर्च मध्ये MBA पूर्ण केले. ऑकलँड विद्यापीठातून त्यांनी कम्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या पतीचे नाव भरत देसाई आहे. त्यांना दोन मुलं आहेत. नीरजा आणि भारत यांची भेट अमेरिकेत TCS मध्ये काम करताना झाली.

नीरजा यांनी पतीसह 2,000 डॉलरमध्ये म्हणजे 1.6 लाख रुपये खर्च करुन सिंटेल ही आयटी कंपनी सुरु केली. 1980 मध्ये मिशिगन राज्यातील टॉय या शहरात त्यांनी अपार्टमेंटमधून या कंपनीची सुरुवात केली.

2018 मध्ये फ्रान्सची IT कंपनी Atos SE ने सिंटेल ही कंपनी 3.4 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली. नीरजा यांना या सौद्यातून अंदाजित 51 कोटी रुपये मिळाले होते. कंपनीच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी कंपनीचे सर्व सूत्रं हाती घेतली होती. कंपनीच्या अधिग्रहणानंतर त्यांनी Atos मध्ये काम करण्यास नकार दिला.

आज नीरजा सेठी या फ्लोरिडा येथे फिशर आयलँडमध्ये राहतात. 2023 सह अनेकदा फोर्ब्स च्या यादीत अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. जगातील अनेक महिलांनी उद्योगात त्यांचे अढळ स्थान निर्माण केले आहे. स्वतःची कंपनी तयार केली आहे. त्यात नीरजा यांचे नाव अव्वल स्थानी येते.