
येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वाधिक उत्सुकता लागलेला हा सामना आहे. भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? असा प्रश्न अनेकांनाच पडला होता. परंतु आता ही लढत होणार अल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरील काळे ढग दुर झाल्यानंतर या सामन्याचे तिकीट खूपच महागले आहे. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यानच्या जाहिरातीचा दरही गगनाला भिडला आहे. हॉटेल, विमान प्रवासाचे तिकीटही महागले आहे.

याआधीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान जाहिरातीचा दर थेट 75 टक्क्यांनी वाढला होता. यावेळीदेखील हा जाहिरात दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सामना सुरू असताना जाहिरात द्यायची असेल तर जाहिरात दर 10 सेकंदांसाठी तब्बल 70 लाख रुपयांपर्यंत गेला आहे.

जाहिरातीचा हा दर पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तुलनाच करायची झाल्यास आयपीएलमध्ये 10 सेकंदांच्या जाहिरातीचा दर साधारण 20 लाख रुपये राहिलेला आहे. परंतु आता हा दर थेट 70 लाख रुपयांपर्यंत वाढल्याने सगळेच चकित झाले आहेत.

यावेळी टी 20 विश्वचषकाचे मीडिया अधिकार जिओस्टारकडे आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना झाला नसता तर या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असता. आता भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार असल्याने प्रक्षेपणाचा अधिकार असणाऱ्या कंपन्यांचा फायदाच फायदा होणार आहे.