CM Vijay : विजय यांचा मास्टरस्ट्रोक ठरणारा निर्णय, श्रेयवादासाठी भांडणाऱ्या राजकारण्यांसमोर घालून दिला आदर्श
CM Thalapathy Vijay : थलपती विजय यांनी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून ते चर्चेत आहेत. त्यांच्या राजकीय यशाबरोबर खासगी आयुष्याची सुद्धा चर्चा होते. आता थलपती विजय यांनी आपल्या कृतीतून इतर राजकारण्यांसमोर एक चांगलं आदर्श उदहारण ठेवलं आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून थलपती विजय एकापाठोएक चांगले निर्णय घेत आहेत. आधी त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे 200 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी अजून एक चांगला निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सोमवारी राज्यभरातील अम्मा उनावगम म्हणजे अम्मा कँटीनचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला स्वस्त आणि चांगल्या दर्जाचं जेवण मिळणार आहे.

अम्मा कँटीनमध्ये मिळणारं जेवण चांगल्या गुणवत्तेच नसून चव समाधानकार नाही अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत थलपती विजय यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रेटर चेन्नई नगरपालिकेकडून 383 अम्मा कँटिन चालवले जातात. अन्य नगरपालिकातंर्गत 237 अम्मा कँटिन संचलित आहेत.

अम्मा कँटिनसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याचे, स्वयंपाक उपकरणं तात्काळ विकत घेण्याचे आणि जनतेला कुठल्याही अडथळ्याशिवाय चविष्ट आणि चांगल्या दर्जाचं भोजन उपलब्ध करुन देण्याचे विजय यांनी निर्देश दिले आहेत.

खरंतर अम्मा कँटिन ही तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या सरकारची योजना आहे. त्यांनी गरीबांसाठी ही योजना चालू केली होती. आता विजय यांनी या योजनेत सुधारणा करुन ती सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या श्रेयवादाच्या राजकारणात हा निर्णय खूप बोलका आहे. इतर राजकारण्यांसमोर आदर्श घालून देणारा आहे.