
आजकालच्या कॉर्पोरेट युगात तसेच मोठमोठ्या बैठकांमध्ये चहा पिताना सिगारेट ओढणं हा ट्रेंड झाला आहे. याला काहीजण स्टेटस सिम्बॉल असेही म्हणतात. काहीजण कामाच्या ब्रेकदरम्यान ताण कमी करण्यासाठी अनेक लोक एकत्र सिगारेट ओढताना आणि चहा किंवा कॉफी पिताना दिसतात.

मात्र, तज्ज्ञांनी या सवयीबद्दल एक गंभीर इशारा दिला आहे. चहामधील कॅफिन आणि सिगारेटमधील निकोटीनचे हे मिश्रण शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. यामुळे तुमचे आरोग्य हळूहळू बिघडते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

धूम्रपान करणे हे फुफ्फुसांसाठी आधीच घातक आहे. पण जेव्हा ते चहा किंवा कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पेयांसोबत केले जाते, तेव्हा हा धोका खूप जास्त वाढतो. डॉ. आशिष जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, निकोटीन आणि कॅफिन एकत्र आल्यावर शरीराचे मोठे नुकसान होते.

चहा किंवा कॉफीमधील कॅफिनमुळे सिगारेटमधून शरीरात निकोटीनचे शोषण लक्षणीयरित्या वाढते. ज्यामुळे शरीराला अधिक हानी पोहोचते. या मिश्रणामुळे हृदय गती वाढते. तसेच रक्तदाबही वाढू शकतो.

यामुळे कार्डियाक ॲरिथमिया आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, चहा पिताना सिगारेट ओढल्यास फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह प्रक्रिया वाढतात. ज्यामुळे दुप्पट नुकसान होते.

ज्यांना चहा आणि सिगारेट एकत्र घेण्याची सवय असेल तर त्यांना पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच तणाव आणि कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. अनेक अहवालांनुसार, चहा-सिगारेटमुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स नावाचे फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. मात्र, धूम्रपान करत चहा प्यायल्यास हे पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे चहा आणि सिगारेटची घातक सवय लगेच बदलणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही सवय हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा. आधी चहा किंवा कॉफी पिण्याचे प्रमाण हळूहळू कमी करून नंतर ते पूर्णपणे सोडून द्या. यानंतर हळूहळू धूम्रपान सोडण्यास सुरुवात करा. उदाहरणार्थ, दिवसातून पाच ते सात सिगारेट ओढत असाल, तर ते हळूहळू कमी करा.

धूम्रपान करणाऱ्या लोकांची संगत टाळणे हा सवय सोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. शरीराचा आळस किंवा ताण घालवण्यासाठी वापरले जाणारे चहा आणि सिगारेटचे कॉम्बिनेशन हे तुमच्या आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते. त्यामुळे, वेळीच सावध व्हा आणि आपले आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा.

(डिस्क्लेमर : यात देण्यात आलेली माहिती आणि उपलब्ध आरोग्य तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी कृपया डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)