Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान पुन्हा लग्न करणार, स्पष्टपणे उत्तर देत म्हणाली की…
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकताच तेजश्रीने खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली वाचा...

मराठी चित्रपटसृष्टीमधील छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तेजश्री प्रधानने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिका आणि चित्रपटांतून तिने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्राची सोज्वळ सून म्हणून ओळखली जाणारी तेजश्री खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने खासगी आयुष्याबाबत मोठे वक्तव्य केले होते.
‘अग्गबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ आणि सध्या चालू असलेली ‘वीण दोघातली ही तुटेना’ अशा मालिकांमधून तेजश्रीने आपली छाप सोडली आहे. मात्र तिच्या व्यावसायिक यशाइतकेच वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता घटस्फोटानंतर अकरा वर्षांनी तेजश्रीने पुन्हा लग्न करण्यास तयार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
मालिकेत तेजश्री समर राजवाडे यांच्यासोबत सुखी संसार करताना दाखवली जाते. पण वास्तविक आयुष्यात तिने घटस्फोटाचे दुःख अनुभवले आहे. तेजश्री आणि शशांक केतकर यांचे लग्न झाले होते. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेच्या सेटवर त्यांच्यात प्रेम जुळले. मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांचे नाते तुटले. घटस्फोटाचे नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. आजही तेजश्री सिंगल आहे. त्यामुळेच चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत. आता मात्र तेजश्रीने स्वतःच याबाबत स्पष्ट उत्तर दिले आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तेजश्रीला प्रेम आणि लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले. ‘तुला असं वाटतं का की तू पुन्हा प्रेमात पडू शकतेस?’ असा प्रश्न विचारताच तिने क्षणाचाही विलंब न करता ‘नक्कीच’ असे उत्तर दिले.
त्यानंतर ‘तुला आयुष्य स्थिर करायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारला असता तेजश्री हसत आणि आनंदाने म्हणाली, “का नाही? नक्कीच...” तिच्या या स्पष्ट आणि सकारात्मक उत्तरामुळे चाहते आनंदित झाले आहेत. तेजश्री पुन्हा लग्न करण्यास तयार असल्याचे तिने सांगितल्याने आता तिच्या नव्या आयुष्याच्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.