
राज्यातील पहिला दलित सरपंच निवडून आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जळगावच्या आसोदा गावाला भेट दिली होती.या भेटीची आठवण आजही गावकऱ्यांच्या मनात जीवंत आहे. या भेटीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या गावात तीन दिवस मुक्काम केला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातला पहिला अनुसूचित जातीचा सरपंच हा जळगाव तालुक्यातील आसोदा या गावात झाला होता.

राज्यातला पहिला अनुसूचित जातीचा सरपंच आसोदा गावात बनल्याची बातमी कळल्यानंतर आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आसोदा गावात आले होते. त्यावेळी मोतीराम महिपत पाटील यांच्या घरी बाबासाहेब उतरले होते.

जुलै १९२६ च्या या ऐतिहासिक भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावातील वाड्यात दौलतराव पाटील, मोतीराम पाटील यांच्या घरी तब्बल तीन दिवस वास्तव्य केल्याचे गावकरी सांगतात.

दौलतराव दामू पाटील, मोतीराम महिपत पाटील आणि दगाजी शामराव पाटील आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन धनजी रामचंद्र बिन्हाडे यांची सरपंचपदी निवड केली होती.

तीन दिवसाच्या या मुक्कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गावकऱ्यांच्या घरी गेले आणि मोठ्या आनंदात त्यांनी चटणी भाकर ठेचा खाल्ल्याच्या देखील आठवणी गावकरी सांगत आहेत.

याच भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी गावातील तीन विहिरी देखील सर्वांसाठी खुल्या केल्या होत्या, असे जुने जाणकार सांगतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन दिवसांच्या भेटी संदर्भातल्या आठवणी आजही गावकऱ्यांना प्रेरणा देतात.

जळगाव तालुक्यातील आसोदा या गावात ज्या वाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन दिवस मुक्काम केला होता. त्याच ठिकाणी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी किशोर पाटील यांनी आढावा घेतला असून गावकऱ्यांशी बातचीत केली.