लडाख किंवा मानसरोवर नव्हे हे तर संगमरवरी दगडांचे डम्पिंग ग्राऊंड, आता बनले पर्यटन स्थळ
राजस्थानमधील किशनगड सध्या गरिबांचे लडाख आणि कैलास मानसरोवर बनले आहे. संगमरवर दगडांच्या प्रक्रियेचे एक प्रमुख केंद्र ( डम्पिंग ग्राऊंड ) आता पर्यटकांचे आवडते स्थळ बनले आहे.

राजस्थानमधील किशनगड अचानक पर्यटन स्थळ बनले आहे. येथे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांचे डम्पिंग ग्राऊंड आकर्षक पर्यटन स्थळ बनले आहे. कारण हे पांढरे दगड बर्फासारखे दिसत आहेत. त्यामुळे पर्यटक, छायाचित्रकार आणि चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत आहे.

किशनगड येथील पांढऱ्या संगमरवरी दगडांचा ढीग आता नयमरम्य विशाल बर्फाच्छादित प्रदेशासारखा दिसत आहे.येथील भूरचना एखाद्या बर्फाच्छादित दरीखोऱ्यासारखी दिसत आहे.

भारतातील प्रमुख संगमरवर प्रक्रिया केंद्रांपैकी एक असलेल्या राजस्थानच्या या किशनगडमध्ये, संगमरवर आणि ग्रॅनाइट दगडांना कापून पॉलिश केले जाते. त्यातील टाकाऊ दगड आणि भूकटी ८२ एकर जागेवर डम्प केला जातो. या ठिकाणी १,२०० हून अधिक प्रक्रिया युनिट्समधून दररोज ५,५०० टनांपेक्षा जास्त स्लरी येते.

मुळचे हे औद्योगिक केंद्र आता शुभ्र आणि आकर्षक भासत असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढत चालला केला आहे. जोडपी येथे प्रिवेडिंग शुटसाठी येतात, तर चित्रपट निर्माते आणि संगीत-व्हिडिओ क्रू या पांढऱ्या भूभागाचा एक बर्फाळ पार्श्वभूमी म्हणून वापर करतात. पर्यटक या उंचसखल टेकड्यांवरून घोडेस्वारी देखील करतानाही दिसत असतात.

सोशल मीडियावर या ठिकाणाची तुलना अनेकदा बर्फाच्छादित पर्वतीय प्रदेशांशी केली जात आहे. पावसानंतर, पांढऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे तेजस्वी निळेशार पाणी येथे दिसत आणि त्यामुळे आपण लडाखमध्ये तर नाही ना असा भास सर्वांना होत आहे.

मात्र, या आकर्षकपणा मागे एक मोठी पर्यावरणीय चिंताही लपलेली आहे. अधिकाऱ्यांनी धूळ, भूजल प्रदूषण आणि संगमरवरी कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या दीर्घकालीन समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.या परिसरातील भूजलामध्ये क्षार आणि जडपणा वाढल्याचे, तसेच पाण्यात काही जड धातूंचे अंश देखील आढळले आहेत. जानेवारीमध्ये भारताच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात संगमरवरी स्लरीच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणे आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा करणे यांसारख्या उपाय योजन्यास सांगितले आहेत.