फक्त 30 रुपये खर्च, मुंबईजवळ आहे सर्वात सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न
पावसाळ्यात फिरण्यासाठी मुंबईजवळील सर्वात स्वस्त आणि निसर्गरम्य ठिकाण. एकदा भेट दिली तर पुन्हा-पुन्हा जाण्याची होते इच्छा. तेथील सौंदर्य पाहून मनाला मिळते शांती.

पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही योग्य मानला जातो.

मठाच्या मुख्य गाभाऱ्यात स्वामी गगनगिरी महाराजांची समाधी आणि संगमरवरी मूर्ती आहे. याशिवाय मठाच्या मागील टेकडीवर असलेली नैसर्गिक गुहा भाविकांचे विशेष आकर्षण आहे.

या गुहेत महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती स्थापित करण्यात आली असून, गुहेला भेट देण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मठात दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

पावसाळ्यात धबधबे, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक भेट देतात. कमी खर्चात आध्यात्मिक अनुभव आणि निसर्गरम्य सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर खोपोलीतील गगनगिरी महाराज मठ हे नक्कीच एक उत्कृष्ट ठिकाण ठरू शकते.