
साप म्हटलं की अनेकांची बोबडी वळते. त्यामुळेच त्यांच्यापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः, आपल्या घराच्या आजूबाजूला साप येऊ नये म्हणून आपण खूप काळजी घेतो.

पण, कधीकधी कितीही काळजी घेतली तरी साप घरात शिरतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांना आकर्षित करतात. सापांना आकर्षित करणाऱ्या त्या पाच गोष्टी कोणत्या आहे, हे जाणून घेऊया.

सुगंधी झाडे आणि फुले : काही झाडे आणि फुलांचा वास सापांना खूप आवडतो. त्यामुळे घराच्या आजूबाजूला सुगंधी फुलांची झाडे असतील तर साप तिथे येण्याची शक्यता वाढते. जाई, चमेली आणि केशरची झाडे सापांना जास्त आकर्षित करतात. तज्ज्ञांच्या मते, या फुलांच्या सुगंधामुळे साप या झाडांजवळ नेहमीच असतात. त्यामुळे, घराच्या परिसरात अशी झाडे लावताना काळजी घ्या.

कुजलेला कचरा किंवा पालापाचोळा : घराच्या आजूबाजूला पानांचा ढीग किंवा कुजलेला कचरा साठलेला असल्यास ते सापांसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. या अशा ठिकाणी उंदीर आणि इतर कीटक मोठ्या प्रमाणात येतात, जे सापांचे आवडते खाद्य आहे. उंदीर आणि कीटकांच्या शोधात साप अशा ठिकाणी येतात. त्यामुळेच घराभोवती कचरा साठू देऊ नका. नियमित स्वच्छता ठेवा.

लहान पाण्याचे तलाव : घराच्या परिसरात लहान पाण्याचे तलाव, जसे की कमळाच्या फुलांचे तलाव किंवा कारंजे असतील, तर ते सापांना आकर्षित करतात. या तलावांमध्ये बेडूक आणि इतर छोटे जलचर प्राणी असतात, जे सापांचे खाद्य आहेत. सापांना बेडूक खायला खूप आवडतात. त्यामुळे शिकारीसाठी ते अशा ठिकाणी येत असतात.

वेली आणि दाट गवत : घराच्या परिसरात जमिनीवर पसरणाऱ्या वेली आणि दाट गवत हे सापांना अतिशय आवडतात. ही झाडे सापांसाठी एक थंड आणि सुरक्षित वातावरण निर्माण करतात. सापांना अशा दाट ठिकाणी लपायला मिळते आणि त्यांना अन्न म्हणून कीटकही सहज मिळते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला असे गवत किंवा वेली वाढल्या असतील तर त्या नियमितपणे कापून टाका.

घनदाट झुडुपे आणि उंच झाडे : तुमच्या घराभोवती असलेली दाट झुडुपे, विशेषतः बेरीची झुडुपे, अनेक लहान प्राणी, पक्षी आणि कीटकांना आकर्षित करतात. हे प्राणी सापांसाठी उत्तम खाद्य बनतात. तज्ज्ञांच्या मते, घराच्या आजूबाजूला जर उंच गवत आणि घनदाट झाडी असेल, तर ते सापांना राहण्यासाठी चांगले ठिकाण असते. त्यामुळे, घराचा परिसर नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा. ही खबरदारी घेतल्यास सापांचा धोका टाळता येतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)